काश्मीरमधील २३२ पर्यटक आज महाराष्ट्रात परतणार   

१८३ प्रवासी राज्यात परतले

पुणे : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना आणण्याची मोहीम आणखी वेग घेत आहे. आज (शुक्रवारी) २३२ प्रवाशांसाठी विशेष विमानाचे नियोजन करण्यात आल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. इंडिगो कंपनीचे हे विमान शुक्रवारी दुपारी श्रीनगरवरून महाराष्ट्राकडे झेपावणार आहे. 
 
मागील ४८ तासांपासून केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ महाराष्ट्रातील प्रवाशांना परत आणण्यासाठी विविध पातळ्यांवर प्रयत्न करत आहेत. विशेष विमानांची व्यवस्था करत आहे. गुरुवारी मोहोळ यांच्या प्रयत्नातून १८३ प्रवासी महाराष्ट्रात परतले असून आज २३२ प्रवासी महाराष्ट्राकडे येणार आहेत. राज्य सरकारकडून काश्मीर येथील प्रवाशांना परतण्याची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे. 
 
केंद्रीय मंत्री मोहोळ म्हणाले ’महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना आणण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न सुरू आहेत. जम्मू ते श्रीनगर हा रस्ता बंद असल्याने काही पर्यटक जम्मू येथे अडकलेले आहेत. शिवाय रेल्वेने गेलेल्या प्रवाशांनाही रेल्वे गाड्या रद्द झाल्याचा फटका बसला आहे. महाराष्ट्रातील सर्व पर्यटकांना श्रीनगरमार्गे आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. नागरिकांचे अजूनही जम्मू-काश्मीरच्या विविध भागातून फोन येत असून त्यांची व्यवस्था केली जात आहे.
 
केंद्रीय मंत्री मोहोळ यांची पुतणी अश्विनी हिचा आज (शुक्रवारी) विवाह असून गेले काही दिवसापासून मोहोळ कुटुंबियांकडून याची जोरदार तयारी केली जात आहे. मात्र असे असले तरी गेल्या तीन दिवसांपासून मोहोळ स्वतः वॉररूममध्येच व्यग्र आहेत. काश्मीरमध्ये अडकलेल्या नागरिकांचे येणारे फोन, त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क आणि आवश्यक ती मदत करणे यातच मोहोळ स्वतः व्यग्र आहेत. त्यामुळे एकीकडे मोहोळ कुटुंब ’लग्नघर’ असताना ते स्वतः महाराष्ट्रातील नागरिकांना काश्मीरमधून परत आणण्याच्या ’मिशन’ वरच असल्याचे पाहायला मिळाले.

काश्मीरमध्ये अडकलेल्या ६५७ पर्यटकांचा नियंत्रण कक्षाशी संपर्क 

पुणे : जम्मू-काश्मीर येथे अडकलेल्या ६५७ पर्यटकांनी जिल्हा आपत्ती नियंत्रण कक्षास संपर्क साधला असून २७ एप्रिलपर्यंत एकूण १४८ पर्यटक पुण्यात येणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिली आहे. 
 
गुरुवारी सकाळी १० वाजता पुण्यात विमानाने १० प्रवासी पोहोचले असून, आणखीन १९ प्रवासी विमाानाने येत आहेत. २५ एप्रिल रोजी ७७ तर २६ एप्रिल रोजी १२ प्रवासी विमानाने येणार आहेत. २७ एप्रिल रोजी २९ पर्यटक रेल्वेने येणार आहेत. नियंत्रण कक्ष सर्व पर्यटकांच्या संपर्कात असून, पर्यटकांकडून माहिती घेण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डुडी यांनी कळविले आहे.
 

Related Articles